Published On : Sat, Jan 20th, 2018

निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या हातातील बाहुले

Advertisement

Ashutosh

File Pic


नागपूर: मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करीत असून मागील काही वर्षातील घडामोडीमुळे निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या हातातील बाहुले झाल्याचा घणाघात ‘आप’चे नेते आशुतोष यांनी आज येथे केला. भाजप सरकार आयकर विभाग, पोलिस, ईडी या संवैधानिक संस्थांचा वापर वचपा काढण्यासाठी शस्त्र म्हणून करीत असून त्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता ‘आप’च्या सिव्हिल लाईन येथील कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी काल, शुक्रवारी ‘आप’च्या 20 आमदारांना लाभाचे पद बाळगल्याप्रकरणी अपात्र घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. मात्र, निवडणूक आयोगाची कारवाई संविधानविरोधीच नाही तर नैतिकतेच्या आधारावरही योग्य नसल्याचे आशुतोष म्हणाले. या कारवाईवरून त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, बाजू न ऐकता निवडणूक आयुक्त ज्योती यांनी 20 आमदारांना अपात्र ठरविले, तो दिवस भारतीय लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे नमुद करीत याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणार आहे.

याप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने आमदारांना लाभाचे पद घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमदारांनी लाभाचे पद घेतलेच नाही. एवढेच नव्हे संसदीय सचिवपदी नियुक्ती करताना जे नियुक्तीपत्र देण्यात आले, त्यात या पदासाठी वेतन मिळणार नाही, बंगला मिळणार नाही, असेही नमुद आहे. त्यामुळे लाभाच्या पदाचा प्रश्‍नच निकाली निघाला होता. तरीही निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेले, त्यावेळी आमदारांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु एकाही आमदारांचा पक्ष न ऐकता निवडणूक आयुक्तांनी अपात्र ठरविण्याची केलेली कारवाई आश्‍चर्यजनक असल्याचे आशुतोष म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्योती यांचे जुने संबंध आहेत.

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना ज्योती प्रधान सचिव होते. मुख्य निवडणूक आयुक्तपदी त्यांच्या नियुक्तीवर प्रश्‍नचिन्हही उपस्थित झाले होते. मोदींनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून आप आमदारांना अपात्र ठरविल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे हिमाचल प्रदेश व गुजरात निवडणुकीची घोषणा एकाचवेळी करणे अपेक्षित होते. परंतु मोदी यांना विकास कामांचे भूमीपूजन आदी करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली. विविध राज्यांच्या निवडणुकीची घोषणापूर्वी नोटबंदीमुळे असलेली नाराजी दूर करण्याची संधीही ज्योती यांनी भाजपला दिली. भाजप सरकारच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करीत असून पंतप्रधान कार्यालय लेटर बॉक्‍स बनले असल्याची टिकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढणार
महाराष्ट्रात ‘आप’ला बळकट करण्याचे काम सुरू आहे. यातूनच नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन गेले. महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे.