Published On : Tue, Nov 14th, 2017

सत्रापूर : शेतकऱ्यांच्या जमिनीची गरज नसेल तर परत करा – पालकमंत्री

Advertisement

C Bawankule
नागपूर: जिल्हयातील सत्रापूर उपसा सिंचन योजनेचा जमिनीची प्रकल्पासाठी गरज नसेल तर शेतकऱ्यांना परत करा असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिले.

सत्रापूर उजव्या कालव्यातील कवडक लघु कालव्यासाठी संपादित जागेचा वाढीव मोबदला व सत्रापूर उपसा सिंचन योजनेतील संपादित जमीन परत करण्याबाबत पालकमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती. सन 2013 मध्ये या जमिनीचे अवॉर्ड घोषित केले. त्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात कलम 18 नुसार कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. प्रकल्पासाठी जी जमीन लागणार नाही अशा जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
मिहान पुनर्वसन

मिहानचे पूनर्वसन करताना खाजगी लेआऊट संपादित झाले असल्यास आणि या लेआऊटवरील कुटूंबाचे पुनर्वसन झाले असेल तर 15 दिवसात पुढची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. खापरी, तेल्हारा, कलाकुही, दहेगाव येथील पुनर्वसनाची प्रकरणे व प्रलंबित प्रकरणांवर महसूल अधिकाऱ्यांशी याप्रसंगली चर्चा झाली. विधि व न्याय विभागाकडे असलेल्या प्रकरणांवरही याप्रसंगी चर्चा झाली. मिहान अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. मिहानने संपादित केलेली पण सध्या मेट्रोमध्ये गेलेल्या जमिनीवरील कुटूंबांचे ही पुनर्वसन करावे, अशी पाच कुटूंबे आहेत. ग्रामपंचायतच्या रजिस्टरमध्ये ज्या गावकऱ्यांच्या घराची व जमिनीची नोंद आहे, अशांचे पुनर्वसन केले जाईल. नुकतेच कुणी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्यास ते हटवण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

खापरीगाव पुनर्वसन – मोजणी पूर्ण झाली असून अहवाल प्राप्त झाला आहे. खापरीतही ग्रामपंचायतच्या रजिस्टर मध्ये नोंदणीप्रमाणे पुनर्वसन करा. जुन्या गावठाणातील घरे तोडणे आवश्यक आहे. पोलीसांच्या मदतीने कारवाई करण्याचे निर्देशही पालकमत्र्यांनी दिले.