Published On : Wed, Dec 13th, 2017

सार्धशती कौमुदी या सुवर्ण महोत्सव ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

Advertisement


नागपूर: मध्यवर्ती संग्रहालयाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संग्रहालयाविषयी विशेष तयार करण्यात आलेल्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ‘सार्धशती कौमुदी’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती संग्रहालयाच्या परिसरात आयोजित विशेष समारंभात करण्यात आले.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव संजय भोकरे, पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, मध्यवर्ती संग्रहालयाचे अभीरक्षक डॉ. विराग सोनटक्के, महाऊर्जाचे सारंग महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाला 150 वर्षे पूर्ण झाल्याने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमांतर्गत संग्रहालयाविषयीची ‘सार्धशती कौमुदी’ हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. सुवर्ण महोत्सवी उपक्रमांतर्गत संग्रहालय शास्त्रविषयी या ग्रंथात तज्ज्ञ व्यक्तींचे संशोधनपर लेख असून हा ग्रंथ शासकीय मुद्रणालय नागपूर येथे तयार करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीसह विविध विकास कामांचा शुभारंभ
मध्यवर्ती संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून विविध विकास योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला.

शासकीय वस्तू संग्रहालयाच्या बळकटीकरणांतर्गत संग्रहालयामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा तसेच डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, मेटल हँड डिटेक्टर, बॅगेज स्कॅनर व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेंतर्गत संग्रहालयाच्या सुरक्षेकरिता विविध दालनात तसेच परिसरात 110 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या अत्याधुनिक यंत्रणेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.


संग्रहालयात विजेची बचत करण्याच्या अनुषंगाने मध्यवर्ती संग्रहालयात सौर ऊर्जेची सयंत्र बसविण्यात आली. यामध्ये 25 किलोवॅटची वीज निर्मिती करण्यात आली आहे. मध्यवर्ती संग्रहालयात सौर ऊर्जा सयंत्र बसविण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असेट मॅनेजमेंट सर्व्हिस, नागपूर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मध्यवर्ती संग्रहालयाला 25 किलो वॅट ऊर्जेची आवश्यकता सोलर रुफटॉप या प्रकल्पासून पूर्ण होणार आहे. 320 वॅट क्षमेतेची 69 सोलर पॅनल बसविण्यात आले असून संग्रहालयात दररोज शंभर युनिट वीज उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी 13 लाख 62 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. सोलर ऊर्जेमुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. यावेळी महाऊर्जाचे पुरुषोत्तम जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे विनायक निट्टरकर, विवेक कुळकर्णी, किशोर बोरकर, सुरेंद्र मनपे,ललिता नांदेकर, पंढरी मुरस्कर उपस्थित होते.