Published On : Wed, Jan 17th, 2018

नागपूर पोलिस पासपोर्ट पडताळणीत राज्यात अव्वल

Advertisement

Passport Verification Nagpur Police
नागपूर: नागपूर पोलिसांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करीत पासपोर्ट पडताळणी विक्रमी 6 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करीत आहेत. या कामगिरीत नागपूर पोलिस राज्यात अव्वल स्थानावर आहेत. यापूर्वी याच प्रक्रियेसाठी 28 दिवसांचा वेळखाऊ कालावधी लागत होता. त्यामुळे पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी नागपूर पोलिस दलात पासपोर्ट पडताळणी करणाऱ्या 72 पुरूष व महिलांचे अभिनंदन करून त्यांचा पोलिसांचा सत्कार केला.

आज बुधवारी विशेष शाखेत पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलिस आयुक्‍त डॉ. वेंकटेशम्‌ म्हणाले, राज्यातील अन्य शहर पोलिसांच्या कामगिरीपेक्षा नागपूर पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे. पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा 28 दिवसांचा कालावधी आता 6 दिवसांवर आला आहे. तो कालावधी त्यापेक्षा कमी करण्यासाठी आणखी जोमाने काम करावे लागेल. तशी तयारी पोलिस कर्मचाऱ्यांनी ठेवावी. सकारात्मक प्रयत्न केल्यास यश मिळेलच.

2017 पासून ऑनलाईन प्रक्रिया करीत पेपरलेस पासपोर्ट सेवेला प्रारंभ केला. नागरिकांनी पासपोर्ट अर्ज दाखल केल्यानंतर पोलिस स्टेशन स्तरावर चौकशी व तपासणी मोबईल ऍपच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अर्जदाराला पासपोर्टची स्थिती ऍपच्या माध्यमातून तपासता येते. तसेच अर्जदाराला वेळोवेळी एसएमएस पाठवून माहिती देण्यात येते. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असूनही पासपोर्ट प्रदान करण्याचा कालावधी सर्वात कमी आहे, हे विशेष. मुंबईत 30 दिवस, औरंगाबादमध्ये 42 दिवस, नाशिक-28 दिवस, पुणे-23 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, नागपूर पोलिसांनी केवळ सहा दिवसांत पासपोर्ट सेवा प्रदान केली आहे.

अन्य राज्यातून घेतली प्रेरणा
नागपूर पोलिसांनी 21 ऑगस्ट 2017 ला एन-कॉप्समध्ये देशातील 18 राज्यातील पोलिस विभागाची बैठक घेतली होती. या बैठकीला पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. या बैठकीत तेलंगणा राज्यात सर्वाधिक कमी 6 दिवसांचा कालावधी होता. तर आंध्रप्रदेश-9 दिवस, गुजरात 11 दिवस तर महाराष्ट्र 39 दिवस असा कालावधी दर्शविण्यात येत होता. त्यामध्ये नागपूर पोलिसांचा 28 दिवस कालावधी असल्याने राज्याचा क्रमांक शेवटी होता. डॉ. वेंकटेशम यांनी आवाहन स्विकारून 28 दिवसांचा कालावधी तेलंगणाप्रमाणे कमी करण्यासाठी मेहनत घेतली. आज नागपूर पोलिस राज्यात प्रथम आहे.