Published On : Wed, May 24th, 2017

स्तन कर्करोग तपासणी शिबिराला महापौरांची भेट

Advertisement


नागपूर:
पं.दीनदयाल उपाध्याय इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च ॲण्ड ह्युमन रिसोर्सेस आणि ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान’ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्तन कर्करोग तपासणी शिबिराला महापौर नंदा जिचकार यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान’ समितीच्या नागपूर शहर संयोजिका मनिषा काशीकर, नगरसेवक लखन येरावार आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त बेटी पढाओ-बेटी बचाव अभियाना’च्या वतीने नागपूर शहरात ६१ स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील ५८ व्या शिबिराचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.

आतापर्यंत संपूर्ण शहरात या अभियानाच्या वतीने आतापर्यंत ५८ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यातून ४८१८ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३२ महिलांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. या कॅन्सरपीडित महिलांवर स्थानिक मेयो रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून उपचाराचा खर्च केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून करण्यात येणार आहे.

अभियानाचा समारोप २७ मे रोजी महापौर नंदा जिचकार, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर यांच्या उपस्थितीत अभिनव कॉलनी राजीव नगर येथे होणार आहे. उर्वरीत शिबिरांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक मनिषा काशीकर यांनी केले आहे.

याप्रसंगी कल्याणी तेलंग, कामना सोनवणे, संध्या अडाळे, गंगुताई इटनकर, रामुजी राऊत, गौतम तायवाडे, मनीष डफाहा आदी उपस्थित होते.