Published On : Fri, Jan 19th, 2018

इस्त्रायल, बॉलिवूड एकत्र येणे मनोरंजन क्षेत्रासाठी अद्भुत ठरेल – मुख्यमंत्री

Advertisement

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात इस्त्रायल आणि बॉलिवूड एकत्र आल्यास अद्भुत गोष्टी घडविता येऊ शकतील. इस्रायलकडे तंत्रज्ञान आहे, तर आमच्याकडे तारकांचे प्रभावळ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्रायली चित्रपट आणि तंत्रज्ञान क्षेत्राला निमंत्रण दिले. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनीही बॉलिवूडला इस्रायलमध्ये येण्याचे आवाहन केले.

हॉटेल ताज मध्ये शालोम बॉलिवूड या इस्रायल दूतावासातर्फे आयोजित कार्यक्रमास प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधानमंत्री नेत्यानाहू यांच्या सुविद्य पत्नी सारा नेत्यानाहू यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात निमंत्रित उपस्थितांसमोर ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, इस्रायलचे राजदूत डॅनियल कारमन, याकूब फिकेलस्टाईन उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई ही मनोरंजन क्षेत्राचीही राजधानी आहे. भारतीय सिनेमाचा इतिहास मुंबईपासून सुरु होतो. मुंबईने मनोरंजन क्षेत्रात जागतिकस्तरावरही स्थान निर्माण केले आहे. भारतीय खऱ्या अर्थाने चित्रपटांशी समरसून जगतात. त्यामुळे चित्रपट कलाकारांत देव पाहण्याची वृत्ती आढळते. भारतीय चित्रपट क्षेत्राने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय चित्रपट पोहचला आहे. मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. इस्त्रायलकडे तंत्रज्ञान आहे. तर आमच्याकडे अमिताभ बच्चन आहेत. चित्रपट तारकांची प्रभावळ आहे. केवळ कृषी, वाणिज्य, उद्योग क्षेत्रात नव्हे तर मनोरंजन क्षेत्रातही आपण बॅालिवूड आणि इस्त्रायल एकत्र येण्याने जगाच्या पटलावर अनेक अद्भूत गोष्टी घडवू शकतो.

प्रधानमंत्री नेत्यानाहू यांनी आपल्या भाषणाची सुरूवात हिंदीतून प्यारे दोस्तो अशी केली. ते म्हणाले, जगाचे बॉलिवूडवर प्रेम आहे. तसे इस्त्रायलचेही भारतीय चित्रपट सृष्टीवर आणि बॉलिवूडवर प्रेम आहे. खूप वैविध्यपूर्ण संकल्पना घेऊन भारतीय चित्रपट सृष्टीची वाटचाल सुरु आहे. त्यामुळेच हे चित्रपट अनेकांना भावतात. भारतातील चित्रपट सृष्टीचा उदय हा भारताचाही उदय आहे. इस्त्रायलचा उदय हा तंत्रज्ञानाच्या उदयात सामावला आहे. त्यामुळे आपण एकत्र येण्याने या क्षेत्रात जादू घडवू शकतो. आपली सांस्कृतिक मुळेही खोलवर रूजली आहेत. त्यामुळेच आम्ही इस्त्रायलमध्ये संस्कृत भाषा आणि त्यातील ज्ञान जतनाचेही प्रयत्न करत आहोत. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही अनेकविध क्षेत्राबाबत आग्रही अशी भुमिका आहे. त्यामागे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. तसाच प्रामाणिकपणा प्रत्येक भारतीयात दिसतो. आपल्या भाषणाचा शेवट प्रधानमंत्री नेत्यानाहू यांनी ..जय हिंद, जय महाराष्ट्र..जय इस्त्रायल अशा शब्दांनीही केला.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भारतीय चित्रपट सृष्टी इस्त्रायल आणि भारता दरम्यानचे सांस्कृतिक बंध आणखी दृढ करू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. तत्पूर्वी व्हायकॅाम इंडियाचे सीओओ राज नायक यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.