Published On : Fri, Nov 24th, 2017

भागवतांना गाेवणाऱ्या शरद पवारांना मदत का?- खा.पटोले

Advertisement

पुणे: ‘ज्या राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवारांनी भगव्या आतंकवादाचा मुद्दा काढून सरसंघचालक मोहन भागवत यांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवण्याचा प्रयत्न केला, अशांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी मदत कशी करतात?’ असा खळबळजनक प्रश्न भाजपचे खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी उपस्थित केला. सरसंघचालकांवर हात टाकण्याचा प्रयत्न जे करतात त्यांना फडणवीस- गडकरी मदत का करतात, याचे उत्तर मला हवे असल्याचे ते म्हणाले.पुण्यातील वसंतदादा सेवा संस्थेच्या वतीने आयोजित ‘तीन वर्षांतील फसलेले अर्थकारण’ या विषयावर देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी खासदार पटोले बोलत होते.

“मालेगाव बॉम्बस्फोटात सुधाकर चतुर्वेदी हा संघाचा कार्यकर्ता सहभागी होता. त्याने पत्रकार परिषद घेऊन या बॉम्बस्फोटात मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. याच चतुर्वेदीने शरद पवारांचेही नाव घेतले. ‘हिंदू आतंकवाद’ हा पवारांनी निर्माण केलेला शब्द असल्याचा आरोप त्याने केला. त्याच ‘राष्ट्रवादी’चे प्रफुल्ल पटेल यांनी २४ तासांच्या आत भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. मुख्यमंत्री याच ‘राष्ट्रवादी’ला दिलदार शत्रू म्हणतात. सरकारला वाचवणारे ‘अदृश्य हात’ म्हणतात. खरे तर सरसंघचालकांचे पद असे आहे की पंडित नेहरूसुद्धा त्याचा सन्मान ठेवायचे. असे असताना सरसंघचालकांना गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’चे कौतुक कसे केले जाते?’ असा प्रश्न पटाेले यांनी केला.

‘सध्या जो सरकारविरोधात बोलतोय, त्याला मारून टाकाल का ?” असा थेट सवाल करत खासदार नाना पटोले यांनी मोदी सरकारवर पुन्हा दडपशाहीचे गंभीर आरोप केलेत. बोलताना सोहराबुद्धीन एनकाऊंटर केसमधील जस्टीस लोया यांच्या गुढ मृत्यू प्रकरणाला स्पर्श करत मोदी-शहा यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या राजकीय दडपशाहीवर जोरदार हल्लाबोल चढवला. जस्टीस लोया यांचे नेमके काय झाले ? असा खडा सवालच त्यांनी मोदी सरकारला विचारला. मोदी-शहांच्या कार्यकाळात भाजपमध्ये कुणालाच बोलू दिले जात नसल्याचे सांगत त्यांनी लोकशाही राजकारणातही दडपशाही फार काळ चालणार नाही, असाही इशारा दिला.
राज्यातील फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादीच्या राजकीय मैत्रीवर भाष्य करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या दिलदार शूत्र विधानाचा उल्लेख करत महाराष्ट्रात फक्त एकच भूजबळ आहेत का ? असा थेट सवाल केला. केंद्र आणि राज्यातले सरकार हे हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करत असल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केला.
यावेळी बोलतांना मोदी सरकारचे आणखी एक पक्षांतर्गंत विरोधक आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचेही भाषण झाले.त्यांनीही अर्थव्यवस्थेवर थेट भाष्य करत नोटबंदीच्या निर्णयावर पुन्हा टीकास्त्रं सोडले. तसंच मोदींच्या हुकूमशाही पद्धतीवर कोरडे ओढले.” झिम्बॉम्बेत सलग तीन दशके सत्ता उपभोगलेले मुगाबे यांनाही पायउतार व्हावे लागले तर इथे इतरांची काय कथा ? ” असे खडे सुनावत पंतप्रधान मोदींना पुन्हा वास्तवाची जाणिव करून दिली. तसंच जिथे कुठे सरकार चुकीचे वागेल त्याविरोधात मी यापुढेही बोलणारच कारण भारतातली लोकशाही वाचलीच पाहिजे, असेही सिन्हा म्हणाले. मला कुठले पद हवे म्हणून सरकारविरोधात बोलत नाहीतर लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठीच सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवतोय. असा निर्वाळाही सिन्हा यांनी दिला.