Published On : Wed, Jan 17th, 2018

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट ६० वर्षे करण्याबाबत शासन सकारात्मक – राजकुमार बडोले

Advertisement

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट ६५ वर्ष वरुन ६० वर्ष करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, डॉ.विनोद शहा तसेच विविध ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. बडोले पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले शासन निर्णय तातडीने निर्गमित करावे, ज्येष्ठ नागरिक संघातील प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची समिती तयार करावी. या समितीने ज्या राज्याने ज्येष्ठ नागरिक धोरण केले आहे त्याचा अभ्यास करुन त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत समितीने सादर करावा. या समितीच्या अहवालातील सूचनांनुसार ज्येष्ठ नागरिक धोरणात सुधारणा करण्याबाबत विचार करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याबाबत आवश्यक असलेल्या अर्जाचा नमुना संबंधित तहसिल कार्यालयांना द्यावा. तसेच तो सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा. तसेच म्हाडा व सिडकोसारख्या संस्थांच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये वृद्धाश्रम, टाऊनशिप अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याबाबत त्या संस्थांना सूचना देण्यात याव्यात.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींनी ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट 60 वर्ष करावी, शहरे ज्येष्ठ नागरिक फ्रेंडली करावी, अशा विविध मागण्या यावेळी केल्या.