Published On : Sat, Dec 16th, 2017

संत्रा उत्‍पादन वाढीसाठी शेतक-यांना संत्र्याची कलमे उपलब्‍ध होणे आवश्‍यक : नितीन गडकरी

Advertisement
  • संत्र्याच्‍या योगय विपणनासाठी खाजगी क्षेत्राला सोबत घेणे आवश्‍यक – महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
  • नागपुरातील ‘नोगा’ फॅक्ट्रीचे पुर्नज्‍जीवन करण्‍याचा निर्णय मुख्‍यमंत्र्यातर्फे जाहीर
  • विश्‍व संत्रा उत्‍सवाचे थाटात उद्घाटन


नागपुर: संत्रा उत्पादनाच्या वाढीकरिता केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्‍था, नागपूर यांच्‍या संशोधनाने विकसित केलेल्या संत्र्याच्‍या चांगल्‍या वाणाच्‍या व जास्‍त उत्‍पादनक्षमता असणा-या कलमा व त्‍या कलमांसाठी लागणारे ‘रूट स्‍टॉक’ हे शेतक-यांना मिळणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ, लोकमत समूह, यूपीएल उदयोग समूह व बजाज इलेक्ट्रिक यांच्‍या वतीने नागपूरमध्‍ये 16,17,18 डिसेंबर रोजी होणा-या ‘वर्ल्‍ड ऑरेज फेस्‍टीव्‍हल’ च्‍या स्‍थानिक कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित उद्घाटकीय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणून ते बोलत होते. याप्रसंगी, उद्घाटक म्‍हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विशेष अतिथीच्‍या स्‍थानी केंद्रीय कृषी राज्‍यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत, नागपूरचे पालकमंत्री व राज्‍याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्‍ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, युपीएल समुहाचे अध्‍यक्ष श्रॉफ, बजाज इलेक्ट्रिकचे कार्यकारी अध्यक्ष अतुल शर्मा, लोकमत समूहाचे प्रमुख व माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्‍याने उपस्थित होते.

नागपूरच्‍या मिहानमध्‍ये पतंजलीच्‍या संत्राप्रक्रीया उदयोगासाठी 100 एकरवर शेड उभारले असून त्‍यामध्‍ये प्रतिदिवस 800 टन प्रक्रीया करण्‍याची सुविधा निर्माण झाली आहे. यासाठी पतंजलीचे बाबा रामदेव यांनी पहिल्‍या टप्‍प्‍यात 3 हजार कोटीची गुंतवणूक केली असून या प्रकल्‍पाची एकूण गुंतवणूक 5 हजार कोटीची आहे. या प्रक्रीया-उदयोगासाठी लागणा-या संत्र्याच्‍या मागणी लक्षात घेता या भागामध्‍ये संत्र्याच्‍या विविध जातीची लागवड व त्‍याचे उत्‍पादन घेण्‍यासाठी शेतक-यांनी पुढाकार घेणे महत्‍वाचे आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

संत्र्याचा कडवटपणा हा वाईन निर्मितीसाठी उपयुक्‍त असून त्‍याला निर्यातमूल्‍यही आहे. शेतक-यांच्या संत्रा पिकाचे आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर विपणन (मार्केटिंग) करण्‍यासाठी देशातील विमानतळावरही संत्र्याचे स्‍टॉल्‍स उभारण्‍याचा निर्णय लवकरच घेण्‍यात येणार आहे. महाराष्‍ट्रातील वर्धा येथील सिंदी, तसेच जालना येथे असणा-या ड्राय पोर्टच्‍या (शुष्‍क बंदर) माध्‍यमातून तेथे असणा-या प्रि-कुलिंग, कोल्‍ड स्‍टोरेजच्या (शीतगृह) सुविधेमुळे संत्रा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्‍याची सुविधा निर्माण झाली आहे. साहिबगंज ते हल्दिया या जलवाहतूकीच्‍या जलमार्गाव्‍दारेही संत्रा निर्यात कोल्‍ड स्‍टोरेजच्या सुविधेमूळे शक्‍य झाली असून त्‍यामार्फत बांग्‍लादेश, म्‍यानमार व दक्षिण पूर्व आशिया यासारख्या प्रदेशात निर्यात होणार आहे. यामूळे ‘लॉजिस्टिक कॉस्‍ट’ मध्‍ये (वाहतूकीचा खर्च) बचत होईल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

उत्तर नागपूरातील ‘नागपूर ऑरेंज ग़्रोअर्स असोसिएशन’ (नोगा) या कंपनीचे पूर्वी संत्रा उत्पादने निर्यात होत असत पण आता त्याचा कारखाना बंद पडला आहे. या नोगा फ्कॅट्रीचे कुशल व्यावसायिकांव्‍दारे पुर्नज्‍जीवन करून नागपूरातील संत्रा उत्‍पादने विश्‍वस्‍तरावर पोहचवण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाने पुढाकार घ्‍यावा अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली.


देशातील 40% कृषी योग्‍य जमीनीमध्‍ये गहू व तांदळाचे उत्‍पादन होत असून त्‍याचा कृषी अर्थव्‍यवस्‍थेतील वाटा 16 ते 18% आहे. तर 18% टक्‍के कृषी योग्‍य भूमीत लागवड होणा-या फळे व पाल्‍याभाज्‍यांच्‍या उत्‍पादनांचा कृषी अर्थव्‍यवस्‍थेतील वाटा हा 40% आहे. ही बाब लक्षात घेता शेतक-यांनी पारंपारिक धान्‍य-पिकांसोबतच विश्‍वभरात मागणी असणा-या फळे व पालेभाज्‍यांचे उत्‍पादनही घेणे आवश्‍यक आहे, असे मत केंद्रीय कृषी राज्‍यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी व्‍यक्‍त केले. शेतक-यांनी एकत्रितपणे प्रयत्‍न करून ‘क्‍लस्‍टरच्‍या’ माध्‍यमातून संत्रा-पिकाचे भांडारण, प्रक्रिया करून आपली उत्‍पादने वैश्विक बाजारपेठ उतरवणे काळाची गरज आहे. यासाठी, राष्‍ट्रीय बागवानी मंडळ (एन.एच.बी.) शेतक-यांना फळ व पालेभाज्‍यांची भंडारण क्षमता, पोस्‍ट हार्वेस्‍ट तंत्रज्ञान या संदर्भात मार्गदर्शनाचे कार्य करत आहे. विश्‍व संत्रा महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून नागपूरची ओळख वैश्विक स्‍तरावर पोहचवण्‍यासाठीचा हा पहिलाच प्रयत्‍न प्रशंसनीय आहे, असेही शेखावत यावेळी म्‍हणाले.

पतंजली समूहाचे आचार्य बाळकृष्‍ण यांनी मिहान येथील संत्रा-प्रक्रिया उदयोगासाठी शेतक-यांजवळील कोणत्‍याही प्रतीचा संत्रा विकत घेण्‍याची तयारी दर्शविली असून संत्रा प्रक्रिया झाल्‍यानंतर त्‍याला शाश्‍वत बाजारपेठ मिळण्‍याची संधी शेतक-यांना मिळाली आहे. जैन इरिगेशन व कोका-कोला यांच्‍या सोबत संत्रा प्रक्रिया उदयोगासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे निर्णय झाले आहेत. ‘मिनिट मेड’ या ज्‍यूस कंपनीमध्‍ये बनणा-या ज्यूसमध्ये 85% फ्रुट पल्‍प(फळांचा लगदा) हा पूर्वी अमिरेकेमधून आयात करावा लागत असे. परंतु आत मोर्शीमधूनच या कंपनीसाठी लागणारा 100% फुट्र पल्‍प तयार करण्‍यासाठी निर्णय झाला आहे. अशा त-हेने संत्रा प्रक्रीया उदयोगांची खाजगी क्षेत्राशी सांगड घालणे आवश्‍यक असून संत्रा उत्पादनाची ‘ब्रॅंड व्‍हॅल्‍यू’, मार्केटिंग, जाहिरात व त्‍या उदयोगासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्‍यबळ हे खाजगी क्षेत्राकडे आहे. पंतप्रधानाच्‍या सूचनेनुसार कार्बोनेटेड शीत पेयांमध्‍ये 5% फ्रुट पल्‍प वापरण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. त्यानुसार कोका कोलाने ‘फॅन्‍टा’ या शीतपेयात 10 % फुट्र पल्‍प वापरने सुरू केले आहे. या निर्णयामुळे संत्र्यासारख्‍या ‘टेबल फ्रुट’ ला हक्काची बाजारपेठ उपलब्‍ध झाली आहे. ‘ नागपूर-मुंबई’ या सुपर कम्‍युनिकेशन एक्‍सप्रेस वे ज्‍या शेजारी असणा-या रोड- अ‍ॅम्नेटीज्‌मध्ये प्री-कुलिंग स्‍टोरेज लिंक व कोल्‍ड चेनचा समावेश असल्याने त्याद्वारे शेतमालाची, फळाची वाहतूक केल्या जाणार आहे . पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाला संत्र्याची कलमे शेतक-यांना पुरवण्‍याकरीता 2 कोटी रूपयांचा निधीही देण्‍यात येईल. ‘नोगा’ फ्कॅट्रीचे योग्य प्रकारे पुर्नज्‍जीवन करण्याकरीता महाराष्टृ शासनातर्फे घेतल्या जाणारा निर्णयही यावेळी मुख्‍यमंत्र्यांनी याप्रसंगी घोषित केला.


महाराष्‍ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्‍ट्र राज्‍य पर्यटन विकास महामंडळाच्‍या वतीने कृषी पर्यटनासाठी घेतलेल्‍या पुढाकाराची माहिती यावेळी दिली. विश्‍व संत्रा महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने देशभरातील पर्यटक येथे येतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. लोकमत समूहाचे अध्‍यक्ष व माजी राज्‍यसभा खासदार विजय दर्डा यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात विश्‍व संत्रा महोत्‍सवाचे हे प्रथम वर्ष असून यापुढेही असेच आयोजन करण्‍यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी मुख्‍यमंत्र्याच्‍या हस्‍ते ‘उत्‍कृष्ठ संत्रा स्‍पर्धा’ व स्टॉल्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वर्ल्‍ड ऑरेज फेस्टिवलचा लोगोचेही अनावरण करण्‍यात आले.

या कार्यक्राचे आभार प्रदर्शन, राज्‍यसभा खासदार अजय संचेती यांनी केले. या कार्यक्रमास नागपूरच्‍या महापौर नंदा जिचकार, स्‍थानिक लोकप्रतिनिधी,महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पदाधिकारी, कृषी विदयापीठ व केंद्रीय लिंबु वर्गीव फळ संशोधन संस्‍था, कृषी विभागातील पदाधिकारी, तज्‍ज्ञ व देशभरातील संत्रा उत्‍पादक शेतकरी माठया संख्‍येने उपस्थित होते.


विश्व संत्रा महोत्सवाप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन
कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्घाटकीय सत्रानंतर संत्रा उत्‍पादन, प्रक्रिया यासंदर्भात आंतरराष्‍ट्रीय तज्ञ्ज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित करण्‍यात आले होते. 17 व 18 डिसेंबर दरम्‍यानही संत्राशेती, संत्रालागवड, संत्राउदयोग या सारख्‍या विविधविषयावर तांत्रिक सादरीकरणाव्‍दारे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. कार्यक्रस्थळी आयोजित प्रदर्शनामध्‍ये एन.एच.बी. (राष्‍ट्रीय बागवाणी मंडळ), कर्नाटक, मिझोरम, पंजाब येथील कृषी संस्‍था, महाराष्‍ट्रातील कृषी विदयापीठ, इत्‍यादीचे दालने लावण्‍यात आली आहे. तीन दिवस चालणा-या महोत्‍सवात संगीत, कला, नृत्‍य यावर आधारित सांस्‍कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन नागपूरारतील विविध ठिकाणी करण्‍यात आले आहे.