Published On : Sat, Dec 16th, 2017

कस्तुरचंद पार्कच्या विकासासाठी पाच कोटी

Advertisement


नागपूर: सर कस्तुरचंद डागा यांनी नागपूरच्या विकासाला आपल्या दुरदृष्टीतून नवा आयाम दिला. त्यांची आठवण करुन देणारे कस्तुरचंद पार्क हे शहराच्या संस्कृतीची आणि विकासाची ओळख आहे. नागपूरच्या जीवनाला नवा आकार देणारे केंद्र आहे. नागपूरचे वैभव असलेल्या कस्तुरचंद पार्कच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे पाच कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सर कस्तुरचंद डागा यांच्या पुण्यतिथी शताब्दी समारोहानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे कस्तुरचंद पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, आमदार जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्याम सोनी, गोविंद डागा, विदर्भ इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी, एलीबर्न वार्णे व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, “सर कस्तुरचंद डागा यांनी नागपूरच्या विकासाचा पाया रचला. नागपूर भारतातील व्यापाराचे केंद्र होऊ शकते. हे त्यांनी ओळखले आणि येथून देशांतर्गत नव्हे तर देशाबाहेरही व्यापाराची वृद्धी केली. हेच आपण जर आज ओळखले, सर कस्तुरचंद डागा यांचा आदर्श समोर ठेवला तर नागपरच्या विकासाला नवी दिशा मिळेल. सर कस्तुरचंद डागा यांनी आपल्या दातृत्वातून आपले कार्य अजरामर केले. अश्या व्यक्तीची आढवण या शहराने केली. याचा मला अभिमान आहे.”

सर कस्तुरचंद डागा यांच्या सन्मानार्थ बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दानशुर व्यक्तीचा संबंध जात, भाषा याच्याशी नसतो. तो त्याच्या दानी वृत्ती आणि विकासाच्या दृष्टीशी असतो. सर कस्तुरचंद डागा यांनी आपल्यातील कुशल व्यवसायिकाचा परिचय दिला. ते व्यावसायिक असले तरी त्यांच्याजवळ विकासाची दृष्टी आणि व्हीजन होते.

प्रास्ताविकात नंदा जिचकार यांनी सर कस्तुरचंद डागा यांचा जीवन परिचय देत त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ सुंदर नागपूर साकार करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष शाम सोनी, गोविंद डागा, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, एलीसन वार्णे यांनीही सर कस्तुरचंद डागा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. केंद्र शासनातर्फे सर कस्तुरचंद डागा यांच्यावर टपाल तिकीट प्रकाशित करण्याची विनंती यावेळी मान्यवरांनी केली.


यावेळी सर कस्तुरचंद डागा यांचा परिचय करुन देणारा लघुपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी माहेश्वरी समाजातील भगिनींतर्फे राजस्थानच्या लोककलेची ओळख करुन देणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले. उपस्थितांचे आभार मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, सुवर्णा डागा, राम डागा, कौटिल्य डागा, आशा डागा, ध्रुव डागा यांच्यासह देशभरातील डागा परिवारातील सदस्य, विदर्भ इंडस्ट्रीयल असोसिएशनचे सदस्य, माहेश्वरी समाज बांधव, नगरसेवक नागरिकांची उपस्थिती होती.


डागा परिवारातर्फे आरोग्य व शिक्षणासाठी १ कोटीची देणगी
डागा रुग्णालयात येणा-या गरीबांवरील उपचारासाठी आणि भूमिहीन परिवारातील मुलांच्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी डागा परिवाराने ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. गोविंद डागा यांनी या देणगीची घोषणा केली.