Published On : Wed, Dec 13th, 2017

मुंबईच्या शिक्षिकेचे नागपूरातील समायोजन न्यायालयाच्या निर्देशानुसारच – शिक्षणमंत्री विनोद तावडे

Advertisement


नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या निर्देशनानुसारच मुंबईच्या चेंबूर मधील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात करण्यात आले आहे. मात्र शिक्षिका ढोरे यांचे प्रकरण पुढे करुन काही संस्थाचालकांना शिक्षक भरतीचे रान मोकळे करुन देण्याचा प्रयत्न काही शिक्षक आमदार करीत आहेत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शिक्षक भरती करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रकार होत असतात. शिक्षक भरतीसाठी काही संस्थाचालक शिक्षकांकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार घडतात. अशा तक्रारी शिक्षकच करत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी व शिक्षक भरतीमधील तथाकथित भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षकांची भरती केंद्रीयभूत पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाच्या विरोधात काही संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे याचिका केल्या. या याचिकांची सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने शिक्षक निवड पध्दती करताना याचिका कर्ता शिक्षण संस्थांना विहित कार्यपध्दती अवलंबून शिक्षक पदे भरण्याची परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासनाच्या पारदर्शक शिक्षक निवडीच्या पध्दतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु शिक्षक निवड ही शिक्षण संस्थांमध्ये शासनाच्या केंद्रीयभूत पध्दतीने होऊ नये यासाठी काही शिक्षण संस्थांचा प्रयत्न होता. त्यामुळे राज्य स्तरावर अतिरिक्त शिक्षक उपलबध असल्याचे राज्य सरकारने न्यायालयीन सुनावनीच्यावेळी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

शिक्षण संस्थांना जाहिरातीच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे हा विलंब टाळण्यासाठी कमी वेळेत अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतून आवश्यक असलेले शिक्षक उपलब्ध करुन देणे शक्य होते. त्यामुळे संबंधित शिक्षण संस्थांनी त्यांच्या संस्थांमधील रिक्त पदांची माहिती कळविल्यानंतर शासकीय यंत्रणेने अतिरिक्त शिक्षक यादीतून आवश्यक असलेले शिक्षक सदर शिक्षण संस्थांना उपलब्ध करुन द्यावेत असा निर्णय न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार ढेरे यांचे समायोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील शिक्षक हे भाषा व समाजशास्त्र विषयाचे होते तर काही शिक्षक विज्ञान विषयाचे आहेत. मात्र गणित विषयाकरीता एकही शिक्षक नागपूर विभागात अथवा जवळपासच्या विभागात उपलब्ध नसल्यामुळे संबंधित शिक्षण संस्थेस मुंबई येथून शिक्षक उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र या समायोजन प्रक्रियेचा अपप्रचार करुन काही आमदार संस्थाचालकांना भरतीचे रान मोकळे करुन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि केंद्रीयभूत शिक्षक निवड पध्दतीला विरोध करीत आहेत, अशी टिकाही तावडे यांनी केली.

विद्यार्थीनीला उठाबशाची शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्यात आले
कोल्हापूरच्या भावेश्वरी संदेश विद्यालयाच्या 8 वीच्या विद्यार्थीनीला उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचे आदेश संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कानूरबुद्रुक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात 8 वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला उठाबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका आश्विनी देवण यांनी दिली. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकाराची तातडीन दखल घेऊन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडून ताबडतोब चौकशी अहवाल मागविण्यात आला. यानंतर मुख्याध्यापिका देवण यांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.