Published On : Sat, Oct 21st, 2017

छठ पूजेसाठी मनपा करतेय संपूर्ण व्यवस्था

Advertisement


नागपूर: उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठ पूजेच्या निमित्ताने लाखो भाविक अंबाझरी तलावावर अर्घ्य अर्पण करण्यासाठी एकत्रित होतात. त्यामुळे तेथे चोख सुरक्षेव्यवस्थेसोबतच भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा नागपूर महानगरपालिका उपलब्ध करून देत आहे. या व्यवस्थेची पाहणी शनिवारी (ता. २१) धरमपेठ झोन सभापती रुपा राय आणि माजी सत्तापक्ष नेते ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केली.

छठ व्रत आणि पूजेच्या निमित्ताने दरवर्षी अंबाझरी तलावावर लाखोंच्या संख्येने नागरिक एकत्रित येतात. यंदा २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान हा धार्मिक उत्सव असून २६ ला सायंकाळी आणि २७ ला पहाटे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यात येणार आहे. उत्सवाचे धार्मिक महत्त्व आणि होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मनपातर्फे संपूर्ण तयारी करण्यात येत आहे.


चोख व्यवस्था व्हावी, भाविकाना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश सभापती रूपा राय यांनी अधिकाऱ्यांना दिले. अंबाझरी तलाव घाटासोबतच सभापतीनी फुटाळा तलाव, पोलिस लाईन टाकळी येथीलही पाहणी केली. यावेळी नगरसेवक कमलेश चौधरी, छठ व्रत संस्थेचे पदाधिकारी शैलेंद्र अवस्थी, शशिभूषण मिश्रा यांची उपस्थिती होती.