Published On : Wed, Aug 23rd, 2017

नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

Advertisement


नागपूर:
नागरिकांच्या सोयींसाठी ‘आपली बस’ कार्यान्वित केली आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वर्कशॉपच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.

पटवर्धन मैदान येथील वर्कशॉपमध्ये पाहणीप्रसंगी संपूर्ण वर्कशॉपचा आढावा मान्यवरांनी घेतला. तेथील स्टोअर रूम, ऑईल रूम व दुरूस्तीसाठी आलेल्या बसेसची पाहणी केली. पटवर्धन मैदानात पावसाचे पाणी साचून तेथे चिखल तयार होत असल्याने बसेसला बाहेर काढण्यात व आत आणण्यात अडचण जाते त्यामुळे मैदान समतल करण्याचे प्राकलन तयार कऱण्याचे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पटवर्धन मैदानातील वर्कशॉपचे छप्पर वाढविण्यात यावे, असे आदेश परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी दिले. नव्याने तयार झालेल्या स्वयंचलित बस स्वच्छता यंत्राची पाहणी मान्यवरांनी केली. याप्रसंगी आर.के.सिटी. बस सर्व्हिसेसचे अधिकारी उपस्थित होते.


हिंगणा येथील बस वर्कशॉपमध्ये १४ नादुरूस्त बसेस पैकी आठ बसेस दुरूस्त झाल्या असून चार बसेस दुरूस्त करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्या बसेस तातडीने दुरूस्त करून मार्गस्थ करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. तेथे कार्यरत असलेल्या एसआय़एस या संस्थेद्वारे १८ बसेस वाहकांमुळे मार्गस्थ झाल्या नाही, असे आढळून आले. करारात ठरल्याप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी दिले.